लोकमत न्यूज नेटवर्क शहापूर : तालुक्यातील हेदुचापाडापासून मुख्य रस्त्याला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने, एका ओहळातून पाड्यातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना प्रवास करावा लागतो. ग्रामस्थांनी एका ओहळावर लाकूड-काठ्या टाकून लाकडी पूल बनविला आहे. मात्र, हा पूलच आता पाण्याखाली गेल्याने शाळेत कसे जायचे, हाच प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनाही बाजारात, कामाच्या ठिकाणी, दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही पिढ्याच या स्थितीमध्ये भरडल्या गेल्याचे ग्रामस्थांचे अनुभव आहेत.
तालुक्यातील हेदुचापाडा येथील ओहोळावरील कच्चा पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटतो. पिवळी ग्रामपंचायत हद्दीत हेदुचापाडा पाड्यातील आदिवासींची एकूण १९ घरे आहेत. या पाड्यातील एकूण २३ विद्यार्थी शाळेत जातात. विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावर कोशिंबडे गावापर्यंत येण्यासाठी ओहोळ ओलांडूनच यावे लागते. ओहळावर ग्रामस्थांनी लाकडी-काठ्यांचा पूल बनविला आहे. पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. हाच एकमेव मार्ग असल्याने, पाणी कमी होईपर्यंत त्या गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटतो.
रताळेपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पाड्यातील विद्यार्थी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतात, तर पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण पिवळी येथील किल्ले माहुली शाळेत घेतात. या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी त्यांना दीड किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्ता गाठावा लागतो. मात्र, पावसाळ्यात पूलच पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची पूर्ण गैरसोय होत आहे.
आंदोलनाचा इशाराश्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालू हुमणे, तालुका सचिव प्रकाश खोडक, तालुका युवा प्रमुख रूपेश आहिरे यांनी परिस्थितीची पाहणी केली. अनेकदा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे या रस्त्यासाठी लेखी मागणी केली. जानेवारीत शहापूर पंचायत समितीवर तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यांना जोडणारे मुख्य रस्ते तयार व्हावेत, यासाठी श्रमजीवीतर्फे मोर्चाही काढला होता. एकूण ६५ रस्त्यांपैकी फक्त पाचच रस्ते बनविण्यात आले. उर्वरित रस्त्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याने, आंदोलनाचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
आमची एक पिढी संपली. आता दुसरी पिढी सुरू आहे. आमच्या नशिबी असाच प्रवास आहे. पावसाळ्यात चार महिने म्हणजे तारेवरची कसरत असते. रस्ता नाही, वीज नाही, जास्त पाऊस झाल्यास संपर्क तुटतो. मुलांची शाळेला दांडी होते.- राजेश कोदे, ग्रामस्थ, हेदुचापाडा