ठाणे : डायरेक्ट बेनॅफिट ट्रान्स्फर (डीबीटी) ही योजना राज्य शासनाने लागू केली. पण त्याव्दारे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर भत्याच्या रकमा व मानधन वेळेवर मिळत नाही. यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे डीबीटी रद्द करण्यासाठी विद्यार्थिनी व विद्यार्थी राज्यभरातील आदिवासी विकास अप्पर आयुक्तालय, प्रकल्प कार्यालय आदी ठिकाणी ठिय्या आंदोलन ६ आॅगस्ट रोजी छेडणार आहेत. येथील वागळे ईस्टेटमधील अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन पार पडणार. राज्यभरातील ठिकठिकाणच्या २९ आदिवासी प्रकल्प कार्यालयांसह आयुक्त व अप्पर आयुक्तालयावर विद्यार्थी - विद्यार्थी एकाच वेळी आंदोलन छेडणार आहेत. एप्रिलपासून लागू केलेल्या या डीबीटीमुळे वस्तीगृहातील खानावळी बंद पडल्या आहेत. या योजनेव्दारे मिळणाऱ्या भोजन भत्यातून विद्यार्थींना वस्तीगृहाबाहेर खानावळ लावावली लागत आहे. पण शासनाकडून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार ५०० रूपये दरमहा न मिळता ते तीन-तीन महिन्यांनी मिळत आहे.
या दिरंगाईमुळे खाजगी खानावळीच्या जेवणालाही आदिवासी विद्यार्थ्यांना मुकावे लागत आहेत. या समस्येमुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून गावी जावे लागल आहे. ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी डीबीटी रद्द करून वस्तीगृहातील भोजन व्यवस्था सुरू ठेवण्याच्या मागणीसह शिष्यवृत्तीतील समस्या दूर करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडले जात आहे. वागळे इस्टेट, ठाणे येथील कार्यालयावर कोपरी वस्तीगृहातील सोनाली वळवी, भावना भुसारा व गुरूनाथ सहारे हा लॉ कॉलेजचा विद्यार्थी या ठिय्या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व करणार आहेत.