डोंबिवली : कॅप्टन विनयकुमार सच्चान यांना काश्मीरमध्ये २४ मार्च २००३ ला अवघ्या २५ व्या वर्षी अतिरेक्यांशी देशासाठी लढताना वीरमरण आले होते. शहरातील युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व माहिती असावे, यासाठी महापालिकेने संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाबाहेर घरडा सर्कलनजीक त्यांच्या नावे विनयकुमार सच्चान स्मृतिस्थळ उभारले आहे. दरवर्षी २४ मार्चला तेथे नागरिक येऊन मानवंदना देतात. यावेळी कोरोनामुळे मानवंदना देण्याचा कार्यक्रम बुधवारी मर्यादित स्वरूपात झाला.
एमआयडीसी निवासी भागात कॅप्टन सच्चान राहत होते. त्यांचे शालेय शिक्षण एमआयडीसीमधील सिस्टर निवेदिता शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण पेंढरकर कॉलेजमध्ये झाले. एमआयडीसी निवासी भागातही त्याचे स्मृतिस्थळ उभे करण्यात आले आहे. या दिवशी त्यांच्या एमआयडीसी निवासीमधील राहत्या घरी आणि स्मृतिस्थळावर अनेक नागरिक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जातात. ‘कॅप्टन विनयकुमार सच्चान अमर रहे,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्याचे सामजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.
एमआयडीसीत मुकुंद म्हात्रे यांच्या पुढाकाराने कॅप्टन सच्चान यांच्या घरातून मशाल प्रज्वलित करून ती एमआयडीसी निवासीमधील स्मृतिस्तंभावर आणून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुकुंद म्हात्रे, कॅप्टन विनयकुमार यांच्या मातोश्री व वडील राजाबेटा सच्चन आणि नागरिक उपस्थित होते.
------------