ठाणे : स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आणि घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि. 5 नोव्हेंबर) पहाटे 6:15 वाजता, श्री घंटाळी देवी मैदान, (मंडपामध्ये) येथे भव्य "पितांबरी दिवाळी पहाट 2021" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दि वर्षाचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 'स्वरभास्कर वंदना' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट व तरुण पिढीचे आघाडीचे गायक धनंजय म्हसकर हे पं. भीमसेन जोशी यांची लोकप्रिय गीते सादर करणार आहेत. जुन्या व नव्या जमान्यातील दिग्गज गायक एकत्रित कार्यक्रम सादर करुन नव्या पिढीला भीमसेन जोशींच्या गायकीची ओळख होइल.
कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बडेकर करणार आहेत तर संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना विद्याधर ठाणेकर यांची आहे. कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य माजी नगरसेवक विलास सामंत यांचे लाभले आहे. संपूर्ण कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य आहे. कार्यक्रमाच्या विनामुल्य प्रवेशिका 1, नवयुग सहनिवास, छ. संभाजी पथ, विष्णू नगर, नौपाडा, ठाणे 400602 येथे सकाळी 9 ते 11 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत मिळतील. प्रवेशिकेशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे आयोजकांनी कळविले आहे. हा कार्यक्रम करोनाच्या पाश्वभुमीवर सरकारी सर्व नियमांचे पालन करूनच होणार आहे. अशी माहिती कार्यवाह दुर्गेश आकेरकर यांनी दिली.