पालघर- इंग्रजांच्या विरोधातील चलेजाव चळवळीदरम्यान पालघरमध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पाच हुतात्म्यांना नगराध्यक्ष डॉ.उज्वला काळे ह्यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. ह्यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे उपस्थित मान्यवरांनी श्रद्धापूर्वक पूजन केले. प्रथमच 78 वर्षानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर राखीत हा सोहळा साधेपणाने पार पडला.
14 ऑगस्ट 1942 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले जिल्ह्यातील सातपाटी, वडराई, नांदगाव, घिवली, शिरगाव, मनोर सह हजारो देशबांधव ब्रिटिशा विरोधी घोषणा देत पालघर कचेरीचा ताबा घेण्यासाठी निघाले होते. हे सर्व आंदोलक सध्याच्या हुतात्मा स्तंभा जवळ पोचल्यावर एका इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या आंदोलकांना शिवीगाळ केल्यानंतर चवताळलेल्या आंदोलकानी पोलिसांचे कडे तोडून कचेरीच्या दिशेने कूच केली. यावेळी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी अल्मेडा यांनी केलेल्या गोळीबारात प्रथम गोविंद गणेश ठाकूर हे जखमी होऊन त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. आपल्या सहकाऱ्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने स्वातंत्र्यवीर बदला घेण्याच्या भावनेने बेभान झाले होते. भारत माता की जय, अशा घोषणा देत ते त्वेषाने कचेरीच्या दिशेने चालून गेले. यावेळी झालेल्या अमानुष गोळीबारात राम प्रसाद तेवारी, काशिनाथभाई हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामचंद्र महादेव चुरी आणि सुकुर गोविंद मोरे या पाच देशभक्तांना हौतात्म्य आले.
14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वणगा,उपनगराध्यक्ष उत्तम घरत, जिप.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे,जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन,पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, तहसीलदार सुनील शिंदे आदींसह नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित मास्क, सुरक्षित अंतर राखून ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रथम तहसीलदार कार्यालया जवळील हुतात्मा स्मारका मध्ये जाऊन हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर हुतात्म्यांच्या इतिहासाची शब्दबद्ध केलेल्या ध्वनिफिती द्वारे इतिहास ऐकविण्यात आला. दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी दिन खून के हमारे यारो न भूल जाना,हे स्फूर्ती गीत गायले जात हुतात्म्यांना मान्यवर आणि उपस्थित नागरिकांनी पुष्पचक्र आणि फुले वाहत श्रद्धांजली अर्पण करून हुतात्म्यांच्या रक्ताच्या सिंचनाने पवित्र झालेल्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.यावेळी पालघरवासीयांनी नेहमीप्रमाणे उत्स्फूर्तपणे आपली दुकाने,बाजारपेठा बंद ठेवीत हुतात्म्यांप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.