ठाणे : शहरात चोरी तसेच वाहनांची चोरी करणा-या अटक शबाब सय्यद (३७, रा. कुर्ला, मुंबई), खामोश छेडा (२१, रा. ठाणे) आणि आकाश मारके (२६, रा. ठाणे) या तिघांना ठाणेनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. त्यांच्याकडून चार लाख ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील वाढत्या चो-या आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाणेनगर पोलिसांना दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून परिणामकारक गस्त आणि नागरिकांमध्ये जागरूकता सुरू केली होती. यातच, ८ मार्च २०२१ रोजी मार्केट परिसरातील अग्निशमन केंद्रासमोर उभी केलेली एक रिक्षा चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने एका सीसीटीव्हीच्या आधारे ९ मार्च रोजी शबाब हुसेन रिझवी सय्यद यास कौसा, मुंब्रा येथून अटक केली. सखोल चौकशीमध्ये त्याने दोन रिक्षांची चोरी केल्याची कबुुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून या दोन्ही रिक्षा हस्तगत केल्या आहेत. अन्य एका घटनेत २ मार्च रोजी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल झाली होती. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने खामोश पोपटलाल छेडा याला ८ मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीमध्ये त्याने ४२ हजारांची मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ही मोटारसायकल हस्तगत केली आहे. तर, खारटन रोड येथील एका चोरीच्या गुन्ह्यात आकाश मारके याला उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ८० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट, ४० हजारांची सोन्याची अंगठी असा एक लाख ६४ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.