नालासोपारा (मंगेश कराळे) :- एका दुकानातून दुचाकींसह लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या आरोपीकडून २ गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेल्या रोख रकमेपैकी २ लाख १० हजार रुपये जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी रविवारी दिली आहे.
वालीवच्या धुमाळ नगरच्या पूजा पॅकेजिंग नावाच्या दुकानातून २४ ऑगस्टच्या रात्री दुचाकीसह लाखो रुपयांची चोरी झाली होती. आरोपीने दुकानाचे शटर कशाच्या साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. दुकानात उभी करून ठेवलेली ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी आणि ५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. २५ ऑगस्टला गोविंद पांडे (४०) यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचे वेगवेगळे ४ पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या रिक्षाचा व आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनास्थळ ते भाईंदर असे सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीबाबत बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत आरोपी रोहित चव्हाण (२१), अनिल पाल (२२) आणि विश्वनाथ यादव(२८) या त्रिकूटाला भाईंदर येथून ताब्यात घेत २ लाख १० हजार रुपये जप्त करत अटक केली आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. तर रोहित चव्हाण हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासन) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, मिथुन मोहिते, रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखिल मंडलिक, राहुल कर्पे, दिलदार शेख, अभिजित नेवारे, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, नामदेव ढोणे आणि सोहेल शेख यांनी केली आहे.