ठाणे : मुंबईसह ठाण्यातील घरांची ‘रेकी’ करून नंतर त्याठिकाणी चो-या करणा-या रोहित शेवाळे (३४, रा. कांजूरमार्ग, मुंबई), संजू शेट्टी (३३, विरार, पालघर) आणि भूषण बांदेकर (२४, चारकोप, मुंबई) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट-५ ने अटक केली आहे. त्यांनी १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यातील ठाण्यातील ११ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची ‘टीप’ युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली रणवरे यांच्या पथकाने ठाण्यातील कोपरी येथील आनंद सिनेमा भागात १९ आॅक्टोबर रोजी सापळा लावून रोहितसह तिघांना अटक केली. त्यांच्या कसून चौकशीमध्ये कोपरीतील एक, श्रीनगर भागातील आठ, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तीन आणि मुंबईतील नवघर पोलीस ठाण्याच्या परिसरातील दोन अशा १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची त्यांनी कबुली दिली. तिघेही अट्टल चोरटे असून त्यांच्यावर ठाणे, मुंबई परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी रोहितवर मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्याच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख सात हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींकडून आणखीही घरफोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
घरांची रेकी करून मुंबईसह ठाण्यात चोरी करणारे त्रिकूट गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:05 PM
ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या करणारे अट्टल चोरटे कोपरी भागात येणार असल्याची ‘टीप’ ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. त्याआधारे त्रिकुटाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ठाण्यातील ११ चोऱ्या उघड झाल्या आहेत.
ठळक मुद्देदोन लाखांचा माल हस्तगत१४ घरफोड्यांची कबुलीठाणे गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटची कामगिरी