- सदानंद नाईक उल्हासनगर - शाळेच्या सहलीसाठी चढणीवर उभी केलेली खाजगी बस हॅन्डब्रेक न लावल्याने, खाली येऊन कार, रिक्षा, विधुत खांब व एका घराला धडक दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता घडली असून बस चालकाला विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील एका शाळेची शुक्रवारी सकाळी सहल जाणार होती. सहलीच्या मुलांना घेण्यासाठी आलेल्या बस चालकाने बस चढणीवर उभी केली होती. बस उभी केल्यानंतर बस खाली उतरतांना चालकाने हॅन्डब्रेक लावला नाही. त्यामुळे बस सुरू होऊन चढणीवरून खाली आली. यावेळी बसने ३ कार, रिक्षा, विधुत खांबाला धडक देऊन एका घराला धडक दिली. यामध्ये वाहनाचे व घराचे नुकसान झाले. सुदैवाने शाळा लवकर भरल्याने, मोठी दुर्घटना टळली. तर दोन महिला थोडक्यात वाचल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. बस चालक मद्यधुंद असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी करून त्याला विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी दिली आहे.