डोंबिवली : अतिज्वलनशील हायड्रोजन गॅसने भरलेले सिलिंडर असलेले सात-आठ ट्रक निष्काळजीपणे एमआयडीसी फेज २ येथील इंडो अमाइन्स केमिकल कंपनीबाहेरील रस्त्यावर उभे करण्यात आले आहेत. या कंपनीविरोधात मनसेने मानपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.रविवार सकाळपासून एमआयडीसी फेज २ येथील इंडो अमाइन्स केमिकल कंपनीच्या बाहेरच्या रस्त्यावर घातक आणि ज्वलनशील हायड्रोजन गॅसच्या सिलिंडरने भरलेल्या सातआठ गाड्या निष्काळजीपणे आणि बेकायदा उभ्या होत्या. यापैकी कोणत्याही गाडीबाबत काही दुर्घटना झाल्यास सर्वच गाड्यांतील सिलिंडरचे स्फोट होऊ न संपूर्ण डोंबिवलीच नष्ट होण्याची भीती एका स्थानिक रहिवाशाने मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश कदम यांना कळवली. त्याआधारे कदम आणि मनसे विद्यार्थी सेना डोंबिवली अध्यक्ष सागर जेधे हे त्वरित तेथे गेले. तेथे गेल्यानंतर स्थानिक पोलीस, एमआयडीसी, कामा, इंडस्ट्रीयल सेफ्टी, अग्निशमन दल, प्रदूषण महामंडळ यांच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबतची तक्रार करून तेथे उपस्थित राहून कंपनीवर त्वरित कारवाई करण्यास कदम यांनी त्यांना सांगितले.संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणावर रोख आणण्याचे लेखी आश्वासन मनसेने संबंधित अधिकाऱ्यांकडून मागितले आहे. लाखो डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळणाºया इंडो अमाइन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी लेखी तक्रार केली.
आमची कंपनी कोणत्याही प्रकारची स्फोटक रसायने बनवत नाही. शेकडो कामगार असून कंपनीत सुरक्षाव्यवस्थेची यंत्रणा आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारांना कसलाही धोका नाही. कंपनीकडे सर्व परवाने आहेत. कंपनीबाहेरील गाड्या आमच्या नसून कच्चा माल पुरवठादारांच्या आहेत. त्या गाड्यांशी कंपनीचा संबंध नाही. त्यामुळे कदम यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.- सी. एल. कदम, संचालक,इंडो अमाइन्स लिमिटेड