भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर तालुक्यातील पिंपळास रेल्वेपुलावर सोमवारी पहाटे ट्रकचे स्टिअरिंग लॉक झाल्याने ट्रक रस्त्यात उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तीन तास खोळंबली होती. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.महामार्गावरील भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील पिंपळास पुलावर पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकचे स्टिअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रेल्वेब्रिजच्या कठड्याला जाऊन धडकला. त्यामुळे ट्रकचे टायर, इंजीन व चेसीस तुटून ट्रक उलटला. या ट्रकमध्ये काच बनवण्याची पावडर होती. ही पावडर घेऊन तो ट्रक श्रीरामपूर येथे चालला होता. या अपघातामुळे नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती.अपघाताची माहिती कोनगाव पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेस मिळताच त्यांनी अग्निशामक दलास पाचारण करत रस्त्यावर पसरलेली पावडर गोळा करून एका बाजूस केली. क्रेनच्या साहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला करत रस्त्यावर सांडलेल्या आॅइलवर माती टाकून पोलिसांनी रस्तावाहतुकीसाठी मोकळा केला.>मोठी वाहतूककोंडीया अपघातानंतर वाहनधारकांच्या सोयीसाठी तीन तास मुंबई जलवाहिनीच्या रस्त्याने वाहतूक सुरू केली होती. हा रस्ता अरुंद असल्याने येथे वाहतूककोंडी झाली होती. तर, नाशिक-कल्याण येथे जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून वळवण्यात आली.
स्टिअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:04 AM