ठाणे : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचा मुद्दा महासभेत गाजला असतांना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. ओसी मिळविण्यासाठी ट्रस्टचा आसरा घेऊन त्यानुसार हॉस्पीटलचे इमले बांधलेल्या या रुग्णालयाने नंतर नोंदणी करतांना मात्र प्रा. लि.अशी केल्याची बाब स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. त्यामुळे आता या रुग्णालयासह शहरातील इतर खाजगी रुग्णालयांनीदेखील अशा प्रकारे पालिकेची किंबहुना ठाणेकरांची फसवणूक केली आहे का? हे तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.पालिकेच्या शहर विकास विभागाकडून २००६ साली ज्युपिटर रूग्णालयाला बांधकामाची परवानगी दिली होती. ती घेतांना त्यांनी ट्रस्टच्या नावाने रुग्णालयाचे काम सुरु केले होते. परंतु, ज्या वेळेस नोंदणीचे काम झाले, त्यावेळेस ती प्रा. लि. अशी केल्याचा धक्कादायक प्रकार शहर विकास विभाग आणि आरोग्य विभागाने दिलेल्या उत्तरामुळे उजेडात आला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य संजय वाघुले यांनी केला. विशेष म्हणजे एखादे रुग्णालय जर ट्रस्टच्या नावे सुरु असेल तर त्यानुसार १० टक्के गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार आणि ५ टक्के रुग्णांना ५० टक्के पैसे घेऊन उपचार देणे अपेक्षित असते. परंतु या रुग्णालयाने केवळ ओसीसाठी ही परवानगी घेऊन नंतर प्रा. लि. कंपनीचा आधार घेत महापालिका आणि ठाणेकरांची फसवणूक केल्याने या रुग्णालयाची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी सदस्यांनी केली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब, संजय वाघुले, मनोज शिंदे यांची त्रिसदस्ययी समिती नेमून चौकशीचे आदेश सभापती म्हस्के यांनी यावेळी दिले. परंतु केवळ ही चौकशी या रुग्णालयापुरती मर्यादीत न ठेवता अशा प्रकारे शहरातील रुग्णालयांचीही तपासणी करावी अशी सुचना मनोज शिंदे यांनी केली.
ओसीसाठी ट्रस्टचा घेतला आसरा
By admin | Published: January 06, 2016 1:06 AM