भार्इंदर : शहरात उपनिबंधक कार्यालय सुरू करण्यास २०१२ मध्ये आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. हे कार्यालय आपल्याच प्रयत्नाने सुरू होत असल्याचा दावा भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर गीता जैन यांनी केला आहे. न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे. सरकारी निमंत्रणपत्रिकेतून पालिका आयुक्त अच्युत हांगे, तर भाजपाच्या पत्रिकेतून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नावे वगळण्यात आल्याचे मीरा-भार्इंदर हाऊसिंग फेडरेशन, निर्भय भारत संघटना व ठाणे जिल्हा वकील संघटनेने शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. रविवारी उपनिबंधक कार्यालयाचे उद््घाटन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हे कार्यालय केवळ आपल्याच प्रयत्नातून होत असल्याचा दावा मेहता व महापौरांनी केल्याने थेट युती सरकारच्या कारभारालाच आव्हान दिले, असा आरोप निर्भय भारतचे अंकुश मालुसरे, प्रकाश नागणे, फेडरेशनचे विजय पाटील, वकील संघटनेचे अॅड. सतनाम सिंह यांनी केला आहे. या संघटनांच्या माध्यमातून २००७ पासून उपनिबंधक कार्यालय सुरू करण्याचा पाठपुरावा सुरू होता. २०१२ मध्ये पालिकेत आघाडीची सत्ता आल्यानंतर या पाठपुराव्याला यश येऊन पालिकेने रामनगर येथील विभागीय कार्यालयात उपनिबंधक कार्यालयाला जागा दिली. > काही महिन्यांपूर्वी सहकार आयुक्तांनी उपनिबंधक दिनेश चंदेल यांना आदेश दिल्यानंतर कार्यालयाच्या हालचालींना वेग आला. अखेर, रविवारी उद््घाटन होत आहे. यामागे केवळ सामाजिक संघटनांचेच नव्हे तर पालकमंत्री शिंदे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, आ. मुझफ्फर हुसेन, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचेही योगदान असल्याचे सांगण्यात आले.
उपनिबंधक कार्यालयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न
By admin | Published: April 23, 2016 1:58 AM