कल्याण - एकीकडे खासगी रुग्णालये म्हणजे निव्वळ लुटमार असा समज रूढ होत असतानाच कल्याणातील 'उमा फाऊंडेशन'ने मात्र या प्रतिमेला छेद देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. गरोदर महिलांना अत्यल्प दरात प्रसूती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाने 'उमाई जननी आरोग्य कवच' योजना आणली असून मंगळवारी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते तिचे लोकार्पण करण्यात आले. अशा प्रकारे एका खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा देण्याचे हे महाराष्ट्रातील बहुधा पहिलेच उदाहरण आहे.
वैद्यकीय सेवा या केवळ श्रीमंतांसाठीच आहेत की काय? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. त्यातही गरोदरपणासह प्रसूती काळातील उपचारांचा खर्च पाहता सामान्यांचे डोळे पांढरे होतील असे चित्र आहे. मात्र या पार्श्वभूमीवर ही स्थिती बदलण्याबरोबरच आपल्या आईचे स्वप्न साकारण्यासाठी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. साईनाथ बैरागी यांनी 'उमाई जननी आरोग्य कवच' योजनेद्वारे घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. या योजनेंतर्गत गरोदर स्त्रियांची नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे होणारी प्रसूती अत्यल्प दरामध्ये केली जाणार आहे. त्यासाठी गरोदर स्त्रियांना प्रथम नावनोंदणी करणे बंधनकारक असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणीही पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.
तर रुग्णांच्या कुटुंबियांचा प्रत्येकी 1 लाखांचा अपघात विमाही विनाशुल्क काढण्यात येणार आहे. गरोदर काळात योग्य उपचार न मिळाल्याने आपल्या आईला पहिले अपत्य गमवावे लागले. त्याची सल सतत तिच्या मनात होती. आपल्याबाबत जे झालं ते इतरांबरोबर होऊ नये, सर्वसामान्य घटकातील महिलांनाही वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत हे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. आईचे हेच स्वप्न आम्ही 'उमाई जननी आरोग्य कवच' योजनेच्या माध्यमातून पूर्ण करीत असल्याचे डॉ. बैरागी यांनी सांगितले. उमा फाऊंडेशन आणि डॉ.साईनाथ बैरागी यांनी आखलेली ही योजना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. ज्याचे अनुकरण इतर खासगी रुग्णालयांनीही करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.