उल्हासनगर : भाजप प्रवेशासाठी अर्जुन काळे मृत्यू प्रकरणी अडकविण्याचा प्रयत्न कलानी पितापुत्र करीत असल्याचा आरोप भारत गंगोत्री यांनी प्रसिद्धपत्रकात करून खळबळ उडून दिली. तसेच शिवसेना शिंदेगट कारवाईसाठी दबाव आणत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील भाटिया चौकात १७ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता अर्जुन काळे यांच्या गाडीला अपघात होऊन, गंभीर जखमी झाला होता. त्याचा साथीदार मात्र घरी पळून गेला होता. जखमी काळे यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा २२ मे रोजी मृत्यू झाला. अर्जुन काळे यांच्या मृत्यूला भारत गंगोत्री यांच्यासह त्याचे साथीदार जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांनीच त्याला मारल्याने, मृत्यू झाल्याचे म्हटले.
अर्जुन काळे याने साथीदारांसह मोबाईल हिसकावून पळून जात असताना अपघात होऊन जखमी झाल्याचे स्पष्टीकरण गंगोत्री यांनी दिले. तसेच पोलिसांनी अर्जुन काळे यांच्यासह साथीदारकडून चोरलेले मोबाईल हस्तगत केले असून शवविच्छेदन अहवालात अपघाताने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. असे गंगोत्री यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले. मयत अर्जुन काळे याचे नातेवाईक व जखमी मित्राला कलानी महल मध्ये कलानी पितापुत्र बोलावून माझ्या विरोधात कटकारस्थान रचत असल्याचेही गंगोत्री यांचे म्हणणे आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात नेताजी गार्डन येथे राष्ट्रवादी पदाधिकारी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला भारत गंगोत्री यांना आमंत्रित केले नसल्याने, पक्षातील वाद चव्हाट्यावर आला. पदाधिकारी शिबीर बैठकीत माजीमंत्री व पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सिंधीं समाजाबाबत काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ गंगोत्री यांनीच प्रथम सोशल मीडियावर टाकला.
त्यानंतर शिवसेना व भाजपने कारवाईसाठी आंदोलन केल्यावर आव्हाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच वादाचा फायदा कलानी कुटुंब यांनी घेऊन माझ्या विरोधात कटकारस्थान करीत असल्याचे गंगोत्री यांचे म्हणणे आहे. अर्जुन काळे याच्या मृत्यू प्रकरणात अडकविण्याची भीती दाखवून भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. यासाठी शिंदे गट कारवाईसाठी सक्रिय झाल्याचे गंगोत्री यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले.
गंगोत्रीच्या प्रसिद्धीपत्रकाने खळबळ भारत गंगोत्री यांनी कलानी कुटुंबासह शिवसेना शिंदे गट व भाजपवर टीका केल्याने, एकच खळबळ उडाली. अर्जुन काळे मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत आहे.