भातसानगर : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरवासी गर्दी करत असल्यामुळे स्थानिकांना वंचित राहावे लागत हाेते़. याबाबत दखल घेऊन गावातील लाेकांना प्राधान्याने लस मिळावी, यासाठी मंगळवार आणि शनिवार हे दाेन दिवस राखीव ठेवले आहेत. या दिवशी बाहेरील व्यक्तींना लस दिली जाणार नसल्याचे सरपंच वैभव पाटाेळे, राम पाटाेळे यांनी ‘लाेकमत’ला दिली.
ग्रामीण भागातील केंद्रावर शहरवासीयांची संख्या अधिक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले हाेते. शहापूर तालुक्यातील वासिंद, शेंद्रूण या गावातील लसीकरण केंद्रात स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणे क्रमप्राप्त होते; मात्र ऑनलाईन प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची असल्याने व तिच्याबद्दल अनभिज्ञ असल्याने स्थानिकांचे रजिस्ट्रेशन होत नाही. तसेच वेबसाईट सुरू हाेण्यातही अडचणी येत आहेत.
याचा फायदा शहरातील नागरिक घेत असल्याचे या केंद्रांवर दिसून आले. कल्याण, नवी मुंबई, मुंबईतील अंधेरी, बोरिवली, ठाणे आदी भागांतील नागरिकच रजिस्ट्रेशन झाले असल्याने गर्दी करू लागले. यापैकी कुणी कोरोना संक्रमित असला, तर त्याच्यापासून गावातील नागरिकांनाही त्याचा धोका निर्माण झाला होता.
अखेर ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच गावचे उपसरपंच राम पाटोळे व गावातील नागरिक व तरुण युवक यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून मंगळवार व शनिवार या दोन दिवशी केवळ स्थानिकांना लस देण्याचे ठरवले असून, त्यादिवशी बाहेरील व्यक्तींना लस देण्यात येणार नसल्याचे उपसरपंचांनी सांगितले. जर तसे झाले नाही, तर आरोग्य केंद्रातील लसीकरण बंद पाडण्याचा इशाराही नीलेश पाटोळे यांनी दिला.
रजिस्ट्रेशनची वेळ बदलली
लसीकरण केंद्रावर ७ मे रोजी ४५, ८ मे रोजी १३, तर आज दुपारपर्यंत चार बाहेरील व्यक्तींनी लस घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आजपासून रजिस्ट्रेशनची वेळ ही संध्याकाळऐवजी सकाळी करण्यात आल्याने बाहेरील रुग्ण लवकर येथे पोहाेचले नसल्याचे दिसून आले.