भाग्यश्री प्रधान, ठाणेवय वर्षे केवळ ७२... घशाच्या कर्करोगावर मात करण्याची अचाट इच्छाशक्ती... संघर्षमय जीवनात प्रकाशवाटा शोधण्याची प्रेरणा देणाऱ्या दीपमाळा (त्रिपुरा) तयार करून चरितार्थ चालणारे बाळकृष्ण वैद्य यांचे हे वर्णन आहे. आपल्या विस्कटणाऱ्या जीवनाची घडी त्यांनी जिद्दीच्या बळावर पुन्हा बसवल्याने त्यांचे मित्र यंग मॅन असे त्यांचे चपखल वर्णन करतात.व्यक्तीकडे जिद्द असली की ती व्यक्ती कुठल्याही वयात आणि परिस्थीतीमध्ये समाजात पाय रोवून उभी राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यातील बाळकृष्ण वैद्य. मनाला कधीही म्हातारपण जाणवू देऊ नका असे प्रत्येकाला आवर्जून सांगणाऱ्या वैद्य यांना १९९९ साली घशाचा कर्करोग झाला होता. त्या दुर्धर आजारावर मात करून त्यांनी आपल्या आयुष्याची विस्कटणारी घडी पुन्हा बसवली आणि दीपमाळांसारखेच स्वत:चे आयुष्यही कसे तेजस्वी होईल याची काळजी घेतली. घशाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यावर इतरांसारखे ते डगमगले नाहीत. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी तातडीने घशाचे आॅपरेशन केले आणि त्यानंतर आयुष्यभरासाठी कृत्रिम स्वरयंत्राचा वापर करूनच बोलण्याची सवय त्यांना करून घ्यावी लागली. आजही घशाजवळ बसवलेल्या कृत्रिम स्वरयंत्राला हाताने दाब देऊन ते बोलतात. दरवर्षी कर्करोगाचे चेकींग करून डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये पाळणे तसेच कुठेही पूर्वेतिहास उगाळत न बसता म्हातारपण एखाद्या तरूणाप्रमाणे घालवत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजही हॉस्पीटलमध्ये कर्करोगाने घाबरणाऱ्या रूग्णांना ते भेटतात आणि आपली कहाणी सांगून खंबीरपणे मात करण्याचा सल्ला देतात.त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात पत्नीने दिलेली खंबीर साथही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कर्करोगावर मात करून जिद्दीचे दर्शन घडणारा ‘तरुण’
By admin | Published: November 11, 2015 12:07 AM