मीरारोड: राज्यात लोकशाहीची थट्टा चालली आहे . तीन नापास झालेले विध्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यासारखे राज्यात सत्ता भोगत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. तसेच आम्ही पासा पलटवू आणि त्यासाठी आम्हाला शिडीची गरज लागणार नाही, असे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात भूकंप होणार की काय, याची चर्चा रंगू लागल्या आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेच्या मीरारोड येथील आरक्षण क्रमांक ३०० ह्या खेळाच्या मैदानात उभारल्या जाणाऱ्या स्वर्गीय प्रमोद महाजन कला दालनाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. शिवाय देशातील पहिली ६८ मीटर उंचीची अग्निशमन दलात दाखल झालेल्या टर्न टेबल लॅडर चे लोकार्पण व बीएसयुपी योजनेतील गाळे धारकांना चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन , महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार रवींद्र चव्हाण , मिहीर कोटेचा , निरंजन डावखरे , आयुक्त डॉ . विजय राठोड आदी सह पदाधिकारी , नगरसेवक उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की , प्रमोदजी महाजन यांनी राजकारणात आम्हाला घडवलं. नेतृत्व , वक्तृत्व व कर्तृत्व काय असतं ते शिकवलं आधुनिक भारताच्या शिल्पकारां मध्ये जी नावे प्रामुख्याने घेतली जातात त्यात संपर्कक्रांती साठी महाजन यांचे नाव घेतले जाते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात महाजन यांनी मोबाईल- इंटरनेट क्रांती घडवली. माझ्यासारखे अनेक नेते प्रमोदजींनी तयार केले . प्रमोदजी केवळ राजकारणीच नव्हे तर सिनेमा, नाटक, साहित्यमध्येसुद्धा जाणकार होते. कला सक्त व केले मध्ये रुची असलेले प्रमोद महाजन यांचे नाव असलेले कलादालनाच्या भूमिपूजन करण्याची संधी मिळाली त्या बद्दल पालिकेने आभार मानले.
देशात देवेगौडा व गुजराल यांचे सरकार असताना रमाकांत खलप हे त्यांच्या पक्षाचे एकच खासदार असून मंत्री होते . एकदा चिनी शिष्टमंडळ आले असताना त्यांनी लोकशाही बद्दल विचारणा केली . त्यावेळी महाजन यांनी सर्वात मोठा पक्ष भाजपा विरोधी पक्षात आहे व अन्य प्रमुख पक्षांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे अशी त्यावेळच्या लोकशाहीचे विडंबन झाले होते ते विशद केले .
काही लोक लोकशाहीची थट्टा करतात. राज्यात देखील वेगळी परिस्थिती नाही. नापास झालेले तीन विध्यार्थी हे मेरिटमध्ये आल्यासारखे सत्ता भोगत आहेत. टर्न टेबल लॅडरचा हिंदी अर्थ पासा पलटणे, असा सांगून आम्हाला पासा पालटायला शिडीची गरज लागणार नाही. विना शिडीने पासा पलटू असा सूचक इशारा महाविकास आघाडी सरकारला फडणवीस यांनी दिला. खासदार पूनम महाजन यांनी, आपले वडील आणि आईने लग्ना आधी एकच प्याला नाटकात एकत्र काम होते अशी आठवण सांगितली . दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी त्यांचे सुसंवाद असायचा असे त्या म्हणाल्या.
बीएसयुपी घोटाळ्यामुळे शिवसेनेचा बहिष्कार
महापालिकेच्या सदर कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला. भाजपा-शिवसेना युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन यांच्या बद्दल शिवसेनेला मनस्वी आदर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व.प्रमोद महाजन यांच्या कलादालनास निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हे कलादालन लवकरात लवकर पूर्ण करण्याची खबरदारी शिवसेना घेईल . पण बीएसयुपी योजनेत मोठा भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी शासनाने लावली असताना सदर योजनेतील चाव्या वाटपास उपस्थित राहणे भ्रष्ठाचाराला वाव देण्यासारखे असल्याने कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले .