अनिकेत घमंडी।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाचा सर्वाधिक फटका देवळांना बसला असून शहराचे ग्रामदैवत असलेले श्री गणेश मंदिर संस्थान चार महिन्यांपासून भक्तांविना ओस पडले आहे. मंदिर बंद असल्याने भक्त येऊ शकत नाहीत. त्यामुळे महिन्याला अभिषेक, देणगी, दानपेटी यांच्या माध्यमातून होणारी सुमारे १२ लाखांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी दिली.दामले म्हणाले की, मंदिर बंद असल्याने सगळे उपक्रम बंद आहेत. गुढीपाडव्याच्या तोंडावर हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे तो सगळ्यांना पाळावा लागणार असून आणखी किती वेळ जाईल, हे आताच सांगता येत नाही. जे संकट देशासमोर उभे राहिले, त्यातून मंदिर प्रशासनाची सुटका झालेली नाही. पण, असे असले तरीही मंदिरातील कायम तत्त्वावर तसेच कंत्राटी कामगार अशा एकूण ३५ जणांचे वेतन या चार महिन्यांत थांबवलेले नाही. महिन्याला त्यासाठी पावणेदोन लाखांची तरतूद प्रशासनाला करावी लागते. पण, सगळ्या विश्वस्त मंडळींनी ठरवून कोणत्याही कामगारांचे वेतन थांबवलेले नाही, असे दामले म्हणाले. अजून जेवढे दिवस लॉकडाऊन असेल, तेवढे दिवस कामगारांचे वेतन सुरू ठेवण्यात येणार आहे. अभिषेक, देणगी मूल्य आणि दानपेटी यामधून होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. श्रावण महिना असल्याने भक्तांच्या मागणीखातर अभिषेक सुरू केले, पण त्याला प्रतिसाद अल्प असून ते प्रमाण नगण्य आहे. मंदिराचे मुख्य पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना होम क्वारंटाइन केले असून आता सगळ्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ पाच टक्के स्टाफ मंदिरात येत आहे. मंदिर परिसराचे रोज निर्जंतुकीकरण केले जात आहे. काळजी सगळी घेतली जात असली, तरी हे संकट मोठे असून याला नागरिकांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करावेत, असे आवाहन दामले यांनी केले.मंदिरातर्फे दिली जाणारी आरोग्य, आर्थिक सुविधा मात्र सुरूच असून दरवर्षी त्यापोटी आठ लाखांचा निधी खर्च होत असून यंदा तो वाढण्याची शक्यता आहे. मंदिर प्रशासन आर्थिक मदतीची मागणी करण्याकरिता आलेल्या अर्जांपोटी किमान दोन ते कमाल १० हजार रुपयांपर्यंत निधी उपचाराकरिता देते, असे ते म्हणाले.कौपिनेश्वर मंदिराला दरमहा १५ लाखांचा फटकालोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता शहरातील श्री कौपिनेश्वर मंदिर चार महिन्यांपासून बंद असल्याने मंदिराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मंदिराची नेमकी उलाढाल किती हे सांगण्यास नकार दिला असला तरी जाणकारांच्या मते किमान १० ते १५ लाखांची उलाढाल आहे.देवाचे दर्शन घेता येत नसल्याने भक्तगणांना चुकल्याचुकल्यासारखे होत आहे. मंदिराची दारे बंद आहेत. परिणामी या लॉकडाऊनचा परिणाम मंदिराच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. मंदिर बंद असले तरी देवाची पूजा दररोज होते, सुरक्षा, साफसफाई ठेवावी लागते. परिणामी सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांचा पगार द्यावा लागत आहे. वीजबिले भरावी लागत आहेत. मंदिराचा महिन्याचा एकूण खर्च पाच लाख रूपये आहे, अशी माहिती कौपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टचे सचिव रवींद्र उतेकर यांनी दिली. मात्र त्या तुलनेत सध्या उत्पन्न नाही. एरव्ही नारळ, फुलांच्या वाड्या, नैवेद्य येत असतो, मात्र सध्या तसे काहीच नाही. तसेच अभिषेक, देणगीही येते मात्र सध्या मंदिरच बंद असल्याने भाविक येण्याचा किंवा विधी होण्याचा प्रश्नच नाही. मात्र सकाळची महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती नेहमी होते. श्रावणात विविध पूजा होतात. मात्र यंदा काहीच होणार नाही. केवळ दशक्रिया विधी होतात, मात्र त्यातही सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. सध्या महिन्याचा खर्च राखीव निधीतून केला जात आहे, परंतु आता तिजोरीवरही ताण येऊ लागला आहे. त्यामुळे मंदिरे केव्हा पूर्ववत उघडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिन्याकाठी १२ लाखांची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:32 AM