कल्याण : कासवांची तस्करी करण्यासाठी बिहारहून कल्याणमध्ये आलेल्या एका तरुणाला कल्याण वन विभागाने काल रात्री अटक केली. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एका लॉजजवळ सापळा रचून या तरुणाला अटक करण्यात आली. दिलशान अहमद असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून ५० कासवे हस्तगत करण्यात आली. यामधील ४६ कासव जिवंत तर चार मृत असल्यची माहिती वनविभागाने दिली. बिहार राज्यातील पाटना दानापूर येथे राहणारा दिलशान अहमद ५० कासवे घेऊन काल रात्री पाटलीपुर एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानक येथे उतरला. तो कल्याण रेल्वे स्थानकासमोरील महाराष्ट्र गेस्टहाऊसमध्ये थांबला होता. दिलशान कासवांची तस्करी करण्यासाठी कल्याणमध्ये आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल -बेलापूर, तसेच आर एफ ओ एस. एस कंक यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण वनविभागचे वनपाल मुरलीधर जागकर आणि संपूर्ण टीम आणि सर्पमित्र योगेश कांबळे व वन्यजीव अभ्यासक सुहास पवार यांनी सापळा रचून काल रात्री दीडच्या सुमारास दिलशानला अटक केली त्याच्याकडून ५० ब्लॅक पौंड टर्टल प्रजातींची कासवे जप्त करण्यात आली. दिलशान कासवांची ऑनलाईन तस्करी करत होता. याबाबत वनविभागाची पुढील चौकशी सुरू असून कासवांना लवकर त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात. घरात रोगराई व साथीचे आजार येत नाही, अशा प्रकारचे भ्रामक गैरसमज लोकांमध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कासवांची खरेदी केली जाते. भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ३ ते ७ वर्षांचा कारावास आणि २५,००० रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे. या शिक्षेची तरतूद असतानाही आजही सर्रासपणे कासवाची खरेदी विक्री सुरु असल्याचे दिसून येते.
कासवांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 3:55 PM