मुंबई : राज्यभरात गेल्या २४ तासांत ३ अधिकाऱ्यांसह ९ पोलीस अंमलदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १९ वर पोहोचल्याने पोलीस कुटुंबीयांची चिंता आणखीन वाढली आहे.
लॉकडाउनसह राज्याराज्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. याच आदेशाच्या अंमलबजावणीसह विविध बंदोबस्त, कोरोना रुग्णांची माहिती घेणे, सील केलेल्या ठिकाणांवरील बंदोबस्तासह विविध कामांची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. २२ मार्च ते १४ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी ४२ हजार ४२९ गुन्हे नोंदविले आहेत. यात पुणे शहरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तर ५१९ जणांवर ‘होम क्वारंटाइन’चे आदेश धुडकावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाºया परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले. आतापर्यंत पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ६७ हजार ६८८ तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचे निवारण पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. या कारवाईत पोलिसांनी २७ हजार ३५० वाहने जप्त केली आहेत. अवैध वाहतूक प्रकरणी ९९३ गुन्हे दाखल करत ८५६२ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात एकूण दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.या कारवाई दरम्यान २२ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत राज्यभरात ७ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली होती. तर ४७ पोलिसांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यात मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे. यात राज्यभरात आणखीन १२ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एकूण ५ पोलीस अधिकाऱ्यांसह १४ अंमलदार अशा एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीतही पोलिसांमध्ये कोरोनाचे दडपण कायम असताना ते नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत़ पोलिसांच्या सुरक्षेसाठी राज्यभरात सॅनिटायझर व्हॅन, पोलीस ठाणे स्तरावर वॉक वेची बांधणी करण्यात येत आहे.पोलिसांवर हल्ले सुरुचकोरोनाचे संकट पोलिसांवरही कायम असताना गेल्या २४ तासांत पोलिसांवरील हल्ल्याच्या तीन घटनांची भर पडली. आतापर्यंत याप्रकरणी एकूण ७६ गुन्हे नोंद असून १६२ आरोपींना अटक केले आहे.