लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर (जि. चंद्रपूर) : वणवा भडकून कळमना बांबू डेपोला रविवारी लागलेली आग तब्बल २० तास धुमसत होती. त्यात ५० हजार टन बांबू व निलगिरीचे लाकूड खाक झाले असून, ३० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बल्लारपूरहून आलापल्लीकडे कळमना मार्गाने जाणारी वाहतूक आगीमुळे आठ तास बंद ठेवण्यात आली होती. आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही. कळमनाच्या चोरमोडी नाल्याजवळ कोणी तरी आग लावल्यामुळे रविवारी सकाळपासून वणवा पेटला होता. तो अधिक भडकून बांबू डेपोपर्यंत गेला व डेपोला आग लागली.
२५ अग्निशमन बंब दाखल आग विझविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील अग्निशमन दलाचे बंब व पथक दाखल झाले. बल्लारपूर नगर परिषद, चंद्रपूर महानगरपालिका, दुर्गापूर, घुग्गुस, नागभीड, भद्रावती, राजुरा, गडचांदूर, आवारपूर, उपरवाही, नागपूर, गडचिरोली, चामोर्शी येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या २५ पथकांनी २० तास अविरत मेहनत घेऊन आग बऱ्यापैकी आटोक्यात आणली.
पेट्रोलपंप पूर्ण जळालेडेपो पूर्णपणे जळाल्यानंतर आगीने जवळच्या पेट्रोलपंपालाही कवेत घेतले. सुदैवाने पंप चार दिवसांपासून बंद असल्याने पंपात पेट्रोल आणि डिझेलचा केवळ मृत साठा होता. मात्र, पंप जळाल्याने पंपमालक फुलझेले यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.
आग कशाने लागली, याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांपासून सर्व प्रशासन मिळून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. नुकसान किती झाले, हे सांगता येणार नाही. अजूनही नुकसान मोजणीचे काम सुरू आहे. - संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर