- आरिफ पटेल
लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रात्री वैतरणा नदीच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यात पडून क्रेटा कार उलटली, तर दुसऱ्या ठिकाणी वळणामुळे एका ट्रेलरला कारने धडक दिली. त्यातील जखमींना सेल्वासा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
क्रेटा कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. मनोर पोलिस ठाण्यात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीत वैतरणा नदीच्या पुलावर मुंबई वाहिनीवर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात क्रेटा कार पडून उलटी झाली. या घटनेत चारही चाके वरती झाली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. त्यामध्ये एकटा चालक होता. त्यास किरकोळ दुखापत झाली आहे.
अवघ्या पंधरा मिनिटानंतर त्याच पुलाच्या पलीकडे मुंबईवरून गुजरातच्या दिशेला जाणारी ब्रेझा कारच्या चालकाचे वळण असलेल्या ठिकाणी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱ्या एका ट्रेलरला धडक दिली. त्या कारमधील प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना सेलवासा येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मनोर पोलिस ठाण्यात दोन्ही अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास मनोर पोलिस करीत आहेत.