लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथीलन ‘राकेश ज्वेलर्स’ या दुकानात लुटमार करुन पसार झालेल्या चार दरोडेखोरांपैकी हर्षद मेश्राम (२३, रा. भाल, कल्याण) आणि दिनेश पवार (२५, रा.कल्याण) या दोघांना ठाणे न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते, एक मोटारसायकल आणि जबरी चोरीतील दागिन्यांपैकी दोन सोन्याच्या अंगठया, दोन चांदीचे शिक्के असा ९१ हजार ४०० रुपयांचा मुद्ेमाल जप्त करण्यात आला आहे.घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील ‘राकेश ज्वेलर्स’ या दुकानामध्ये १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास हर्षद आणि दिनेश यांच्यासह चौघे लुटारु दोन कोयत्यांसह शिरले होते. त्यांनी दुकानातील दागिने लुटण्यासाठी दुकानातील सुरेशकुमार जैन यांच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याचे वार केले. त्यानंतर दुकानातील दागिने आणि काही रोकड घेऊन पलायन केले होते. या थरारनाटयानंतर कासारवडवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांना याबाबतची माहिती दिली. जाधव तसेच बिट कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे या दरोडेखोरांचा पाठलाग करीत हर्षद आणि दिनेश यांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. यातील मेश्राम याच्याविरुद्ध नागपूर आणि भंडारा या जिल्हयांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर हर्षदविरुद्ध डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे चौघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांनाही लुटीतील उर्वरित मुद्देमालासह लवकरच अटक करण्यात येईल, असे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोड्यातील दोघा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:10 PM
‘राकेश ज्वेलर्स’ या दुकानात लुटमार करुन पसार झालेल्या चार दरोडेखोरांपैकी हर्षद मेश्राम आणि दिनेश पवार या दोघांना ठाणे न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले आहेत. यातील मेश्राम याच्याविरुद्ध नागपूर आणि भंडारा या जिल्हयांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर हर्षदविरुद्ध डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ठळक मुद्देउर्वरित दोघांचा शोध सुरुचमोटारसायकलीसह दोन कोयते आणि दागिनेही हस्तगत