मीरारोड - भार्इंदर मधील एका पुजापाठ करणाराया पुरोहिताच्या बंगल्यात घरफोडी करुन १४ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन पळालेल्या टोळी पैकी दोघांना नवघर पोलीसांनी दिल्ली वरुन अटक केली आहे. त्यांच्या कडुन ६ लाखांचे दागीने व रोख जपत केले असुन त्यांचे ३ साथीदार व उर्वरीत मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत.भार्इंदर पुर्वेच्या गोल्डन नेस्ट मधील बंगला क्र. ६ मध्ये राहणारे प्रशांत पाठक (६५) हे पुजापाठ करणारे पुरोहित आहेत. ते व त्यांचे कुटुंबिय १४ डिसेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथे एक दिवसाच्या सहली साठी गेले होते. रात्री पावणे नऊ वा. घरी आले असता मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरातील ६० हजार रोख , ३५ तोळे सोन्याचे दागीने व ८ किलो चांदी असा १४ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता.या घरफोडीची वरिष्ठांनी दखल घेतली. पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपास कामी पोलीसांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. उपअधीक्षक शशिकांत भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपतराव पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगेश काळेंसह राठोड, भालेराव, वाघ, गिरगावकर, वाकडे, माने, शिंदे, ठाकुर आदिंच्या पथकाने तपास सुरु केला.परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे ४ संशयीत व दिल्ली येथील नोंदणी असलेली मोटार कार आढळुन आली होती. सदर कारचा शोध घेता ती दिल्ली येथे असल्याचे समजल्यावर पोलीसांचे पथक गुन्ह्यातील कार व आरोपींच्या शोधासाठी दिल्ली येथे सुमारे १५ दिवस तळ ठोकुन होते. तपासात पोलीसांनी अमन अस्लम खान (१९) रा. राठी पिरवाली मस्जीद, खोडा, गाजियाबाद व अमित नारायण प्रसाद गुप्ता (३५) रा. मयुर विहार, दिल्ली या दोघा आरोपींना अटक करुन भार्इंदरला आणले आहे.आरोपीं कडुन ६ लाखांची दागीने व रोख, घरफोडीत वापरलेले साहित्य जप्त करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने आरोपींना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्यात सहभागी त्यांच्या अन्य तीघा साथीदारांसह चोरीच्या उर्वरीत मुद्देमालाचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शशिकांत भोसले यांनी पत्रकारांना दिली.अमित वर पुणे, नवी मुबई, मुलुंड हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असुन तो सराईत घरफोड्या आहे. आरोपी हे दिल्ली वरुन येत आणि टेहळणी वेळी बंद घर आढळले की घरफोडी करुन पुन्हा दिल्लीला पसार होत. दिल्लीला ते भाड्याने रहात व सतत राहण्याची ठिकाणे बदलत अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
१५ लाखांच्या घरफोडी प्रकरणी दिल्ली वरुन दोघा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 8:21 PM