नालासोपारा (मंगेश कराळे) :- जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या दोन आरोपींना २४ तासास अटक करण्यात पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेले मंगळसूत्र आणि चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.
तुंगार फाटा येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दर्शना दत्ताराम खाडे (४४) ही महिला ३ सप्टेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास महामार्गावरून बर्मासेल पेट्रोल पंपासमोरील सर्विस रोडवरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांपैकी एकाने तिच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे ६५ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून ते दोघे पळून गेले होते. महिलेच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. २९ ऑगस्टलाही वालीव पोलीस ठाण्याचे हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा घडलेला असल्याने दोन्ही गुन्हे हे एकाच आरोपींनी केल्याचा संशय असल्याने पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना चैन जबरी चोरी करणा-या आरोपीचा छडा लावुन जेरबंद करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले होेते.
गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळावरील पुराव्याचे बारकाईने परीक्षण करुन तपास कौशल्यावरुन आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या बुलेट दुचाकीचा क्रमांक प्राप्त केला. बुलेटच्या मालकाच्या मार्फतीने गुन्हयातील मुळ आरोपीचा मुलुंड, कुर्ला असा माग काढुन आरोपी भरत मोहनलाल पुरोहित (३६) आणि महेश भवरलाल भावत (३०) यांना डोंबिवली येथुन ६ सप्टेंबरला ताब्यात घेवुन ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे मंगळसुत्र व गुन्हा करण्याकरीता वापरलेली १ लाख रुपये किंमतीची बुलेट असा १ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोनि वसंत लब्दे, पोनि (गुन्हे) विजय पाटील, पोनि (प्रशासन) शिवानंद देवकर, तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, संजय मासाळ, रवि वानखेडे, किरण आव्हाड, राहुल कर्पे, निखिल मंडलिक, अनिल साबळे, दिलदार शेख, सुजय पाटील, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.