ठाणे : अस्तित्वातील जुनी शौचालये दुरुस्त करून ती पुन्हा वापरात आणण्याऐवजी ठाणे महापालिकेने दोन ठिकाणी स्मार्ट टॉयलेट उभारण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे ती झोपडपट्टी भागात बांधण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, महापालिका मुख्यालयासह शहरातील इतर ठिकाणच्या अत्याधुनिक टॉयलेटची अवस्था दयनीय असतांना नव्या टॉयलेटवर तब्बल अडीच कोटींचा निधी खर्च करण्याचा तुघलकी निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.ठाणे महापालिकेने यापूर्वीही अशा प्रकारचे अत्याधुनिक स्वरुपाचे टॉयलेट उभारले आहेत. तर काही ठिकाणी पायलेट प्रोजेक्ट म्हणूनही ती उभारली होती. परंतु,आज त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. महिलांसाठी पथपदांवर खोल्या तयार केल्या आहेत. मात्र, त्यासुद्धा धूळखात पडून आहेत. दुसरीकडे महापालिका मुख्यालयात स्मार्ट टॉयलेट उभारले असून त्यावर कोट्यवधींचा खर्च केला आहे. मात्र त्याचीही अवस्था फारशी चांगली नाही. स्मार्ट टॉयलेट ही कार्पोरेट ठिकाणी उभारल्यास ती सुस्थितीत राहू शकतात. आधीचीच झोपडपट्टी भागातील टॉयलेटची अवस्था पाहल्यास निगा, देखभालीच्या नावाने बट्याबोळ झालेला आहे. कडी, कोयंड्यांचा पत्ता नाही, अशा अवस्थेत ही शौचालये आहेत. असे असतांनाही आता लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या यशोधननगर बस स्टॉप, डवलेनगर हनुमान मंदिर जवळील सार्वजनिक शौचालयांचे स्मार्ट टॉयलेटमध्ये रुंपातर करण्याचा घाट घातला आहे.>असे असणार स्मार्ट टॉयलेट : यामध्ये अस्तित्वातील स्ट्रक्चरमधील लिकेजेस काढून पूर्ण नुतणीकरण करणे, शौचालयाचे फ्लोअरींग काढून त्या ठिकाणी स्टेनलेस स्टील टाईल्स बसविणे, शौचालयाचे स्टेनलेस स्टीलचे भांडे बसविणे आदींसह इतर आधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. या दोन शौचालयांसाठी तब्बल २ कोटी ४९ लाखांचा खर्च प्रस्तावित केला आहे.
स्मार्ट टॉयलेटसाठी मोजणार अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:43 AM