ठाणे : दिल्लीत अलिकडेच इस्त्राईल दुतावास कार्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बॉम्बशोधक पथकासह (बीडीडीएस) शीघ्र कृती दलाची कशी तयारी आहे? याची चाचपणी करण्यासाठी रविवारी रात्री ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ मॉकड्रिल घेण्यात आले. यामध्ये अडीच ते तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर दोन कथित ‘दहशतवाद्या’ना शोधण्यात शीघ्र कृती दलाला यश आले.दिल्लीतील या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर ठाण्यात अशीच एखादी घटना घडली तर पोलिसांसह जिल्हा रुग्णालय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, शीघ्र कृती दल, बीडीडीएस या सर्वच यंत्रणांची कशी तयारी आहे, ते किती वेळात प्रतिसाद देतात. या प्रतिसादानंतर त्यांनी कशी तयारी केली आहे? आपल्या सर्व सामग्रीची ते किती चपळाईने रात्रीच्या अंधारात हाताळणी करतात? हे सर्व या मॉकड्रिलमधून पाहिले जात होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलीस नियंत्रण कक्षातून शीघ्र कृती दलासह या सर्वच यंत्रणांना ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दोन दहशतवादी शिरल्याचा कॉल आला. त्यानंतर बीडीडीएस पथकाचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, शीघ्र कृती दलाचे प्रमुख श्रीकांत सोंडे यांनी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या सात अधिकारी आणि ४५ जवानांच्या चमूसह ठाणे महापालिका मुख्यालयाचा ताबा घेतला. तब्बल दोन तास याठिकाणी अतिरेक्यांचे सर्च ऑपरेशन चालले. तोपर्यंत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या आणि पोलिसांची वाहने पाहून परिसरात घबराट पसरली.मोठ्या प्रयत्नांनंतर दोन अतिरेक्यांना साडेनऊच्या सुमाारास पकडल्यानंतर हे ऑपरेशन फत्ते झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर हे केवळ एक मॉकड्रिल असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
ठाण्यात पोलिसांचे अडीच तासाचे मॉकड्रिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 5:39 AM