लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पावासाळा सुरू झाला की धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न दरवर्षी ठाणे शहराला सतावत असतो. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी इमारतींचा सर्व्हे केला जात असतो. त्यानुसार ठाणे महापालिका हद्दीत सध्या चार हजार ५२२ इमारती या धोकादायक आहेत. यामध्ये ७३ इमारती या अतिधोकादायक असून त्यातील ३० इमारती खाली करून तोडल्या आहेत. परंतु, या धोकादायक इमारतींमध्ये सध्याच्या घडीला तब्बल दोन लाख ५० हजार रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. एकीकडे कोरोनाचे सावट दुसरीकडे मरणाची भीती. परंतु, पावसाळ्यात इमारत खाली करून जायचे तरी कुठे असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे.
पावसाळा जवळ आला की महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे, याचा आढावा घेतला जातो. तसेच पावसाळ्यात जुन्या इमारती पडण्याचा प्रश्न अधिक प्रमाणात सतावत असतो. त्यामुळे अशा इमारतींचा सर्व्हे करून कोणत्या इमारती तत्काळ पाडणे गरजेचे आहे, कोणत्या इमारतींची डागडुजी होऊ शकते. याचा अभ्यास केला जातो. त्यानुसार महापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ अर्थात अति धोकादायक इमारतीचा प्रकार असून अशी इमारत नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर ती जमिनदोस्त केली जाते. तर सी- १- ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्याचे संरचनात्मक परीक्षण केले जाते. यंदा केलेल्या सर्वेक्षणात ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीमधील चार हजार ५२२ धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अतिधोकादायक ७३ इमारतींचा समावेश आहे. त्याचबरोबर सी- २ ए मध्ये १५४ इमारतींचा समावेश आहे. तर सी २ बी मध्ये २४१६ आणि सी ३ मध्ये १८७९ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. त्यामुळे या इमारतधारकांनादेखील नोटिसा बजावल्या असून त्यानुसार दुरुस्ती करण्याचे सूचित केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार नोटिसा बजावून शहरातील ७३ पैकी ३० इमारतींवर आतापर्यंत हातोडा टाकला आहे. तरी सुद्धा सध्याच्या घडीला उर्वरित इमारतींमध्ये तब्बल दोन लाख ५० हजार नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना एकतर भाड्याच्या इमारतीत किंवा रहिवाशांना स्वत:च आपला राहण्याचा बंदोबस्त करावा असेही सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात होणारी हानी टाळण्यासाठी पहिल्या टप्यात महापालिकेच्या माध्यमातून अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात. त्यानंतर त्या इमारतींवर कारवाई केली जाते. तसेच ज्या इमारती दुरुस्त करण्यायोग्य असतील अशा इमारतधारकांना तशा प्रकारच्या नोटिसा बजावल्या जातात.
(अशोक बुरपुल्ले - उपायुक्त, अतिक्रमण - ठामपा)
कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडले आहे, त्यात आता महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, एवढे मोठे कुटुंब घेऊन जायचे कुठे, असा प्रश्न आहे. पालिकेकडून भाड्याची घरे दिली जात आहेत. परंतु, त्याठिकाणी आम्ही ८ ते १० जणांनी कसे राहायचे.
(रवी निकम - रहिवासी)
इमारत धोकादायक झाली आहे, हे आम्हाला दिसत आहे. परंतु, एवढी वर्षे येथे काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहता येईल का? आणि आता नवे घर घेणे देखील परवडणारे नाही. त्यामुळे आहे त्याच घरात राहून संसार चालवायचा पुढचे पुढे बघता येईल.
(रुपेश जाधव - रहिवासी)
कोरोनाची परिस्थिती असल्याने सध्या इमारती खाली करण्यास रहिवासी तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अशा रहिवाशांना वारंवार नोटिसा बजावल्या आहेत. पावसाळ्यात जर काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ही पालिकेवरच येत असते. वास्तविक पाहता येथील रहिवाशांनी नियमानुसार इमारती खाली करणे गरजेचे आहे. परंतु, त्यांनादेखील राहण्याची व्यवस्था होत नसल्याने ऐन पावसाळ्यात दुसरे घर शोधायचे कुठे असा पेच त्यांच्यापुढे असतो. त्यामुळेच तेदेखील तितकेच या घटनेला जबाबदार असू शकणार आहेत.
शहरातील धोकादायक इमारतींची संख्या - ४५२२
इमारतीमधील रहिवाशांची संख्या - २ लाख ५० हजार
प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची यादी
कोपरी नौपाडा - ४५३
उथळसर - १३४
वागळे - १०८६
लोकमान्यनगर - २१७
वर्तकनगर - ५४
माजिवडा- मानपाडा - १९३
कळवा - १९३
मुंब्रा - १४१९
दिवा - ८४१
--------------------
४५२२