लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशन याेजनेतील प्रलंबित बिलातील रक्कमेच्या अडीच टक्के प्रमाणे ४५ हजारांच्या लाचेची मागणी करुन २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कार्यकारी अभियंता विकास जाधव आणि शिपाई चेतन देसले या दाेघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने रंगेहाथ अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली. या दाेघांविरुद्ध ठाणेनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जलजीवन मिशन याेजनेतील प्रलंबित बिलातील अडीच टक्के प्रमाणे ४५ हजारांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली हाेती. त्याबाबत तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे ७ नाेव्हेंबर २०२४ राेजी तक्रार केली हाेती. याबाबत त्यांनी ठाणे एसीबीकडे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ८ नाेव्हेंबर राेजी पडताळणी करण्यात आली. याच कारवाई दरम्यान जाधव यांनी बिलातील शासकिय शुल्क कपात करून उर्वरीत बिलाच्या रक्कमेच्या अडीच टक्के प्रमाणे २७ हजारांच्या लाचेची मागणी केली.
तडजोडअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तेंव्हा ११ नाेव्हेंबर २०२४ राेजी ठाणे एसीबीच्या निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या पथकाने सापळा कारवाई केली. यादरम्यान शिपाई देसले यांना संबंधित तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. याचवेळी कार्यकारी अभियंता जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आले. या दाेघांविरुद्ध ठाणेनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.