ठाणे : बँकेत किंवा एटीएम केंद्रावर रक्कम काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मदतीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून त्यांची फसवणूक करणाऱ्या सूरज विनोद ठाकूर (३०, रा. कशेळी, भिवंडी) आणि सागर अंभोरे (२६, रा. नेवाळी नाका, अंबरनाथ) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे यांनी शुक्रवारी दिली.
सूरज आणि सागर ही दुकली मूळ एटीएम कार्डद्वारे ग्राहकांच्या खात्यातील रक्कम लंपास करीत असल्याचे तपासात समोर आले. ३१ मार्च रोजी या दुकलीने ठाण्यातील अभय ओतारी यांचेही एटीएम कार्ड बदलून फसवणूक केली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, निरीक्षक प्रियत्तमा मुठे आणि संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांचे पथक या आरोपींचा शोध घेत होते.दरम्यान, दोन व्यक्ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती हे पथक गस्तीवर असताना १० नोव्हेंबर रोजी एका खबऱ्याकडून मिळाली. त्याच आधारे सापळा लावून दोघा संशयितांना या पथकाने ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता, त्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध बँकांचे तब्बल ३१ एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. या दोघांनाही ठाणे न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोघेही अट्टल ठग असून त्यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, तळेगाव दाभाडे, पेण, खोपोली, रत्नागिरी आदी ठिकाणी अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासातून समोर आले आहे. अंबोरे याच्यावर २० तर सूरज याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्ह्यांची नोंद आहे.