जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वागळे इस्टेट परिसरातील कोटक महिंद्रा बँकेतून सहा लॅपटॉपची चोरी करणाऱ्या सुधीर बेडंल (३३, रा. किसननगर, ठाणे) आणि दीपक सोनावणे (२२, रा. कल्याण, ठाणे) या दोघांना अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून चोरीतील चार लाख ५६ हजार ८९ रुपयांचे सहा मोबाईल जप्त केले आहेत.
वागळे इस्टेट भागातील कोटक महिंद्रा बँकेच्या कार्पोरेट कार्यालयातून १६ ऑगस्ट ते २१ ऑक्टाेंबर २०२३ या कालावधीमध्ये वेळोवेळी सहा लॅपटॉपची चोरी झाली होती. याप्रकरणी बँकेचे सुरक्षा व्यवस्थापक रोहित अग्रवाल यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार २१ ऑक्टाेबर रोजी दाखल केली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार रविंद्र रकटे, तानाजी खोत, नयना बनसोडे, सुनिल धोंडे आणि मुकींद राठोड आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर याच बँकेत हाऊस किपिंगचे काम करणाऱ्या सुधीर बेडल आणि दीपक सोनवणे या दोघांनाताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान दोघांनी आपला साथीदार कृष्णा कदम याच्या मदतीने लॅपटॉप चोरी केल्याची कबुलीदिली. हे तिष्घेही बँक कार्यालयात हाऊस किपींगचे काम करीत असल्याची बाब तपासात समोर आली. यात सुधीर आणि दीपक या दोघांना २२ ऑक्टाेबर रोजी अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. चोरीतील दोन लॅपटॉप सुधीरच्या तर चार लॅपटॉप विक्री केलेल्या एका व्यक्तीकडून जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख ५६ हजारांचे हे सहाही लॅपटॉप हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.