ठाणे: सोनसाखळी जबरी चोरीसह वाहन चोरी करणाऱ्या वाहीद आरीफ हुसेन उर्फ प्रिंन्स (२७, रा. मनिषानगर, कळवा, ठाणे) आणि मुस्तफा मनवर शेख (२५, रा. ठाकुर पाडा, मुंबा, ठाणे ) या दोघांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांनी गुरुवारी दिली. आरोपींकडून पावणे दोन लाखांच्या मोटारकारसह सोनसाखळीही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कळवा भागातून एक महागडी मोटारकार चोरी झाल्याचा गुन्हा कळवा पोलिस ठाण्यात २२ डिसेंबर २०२२ रोजी दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजेंद्र पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक किरण बघडाणे आणि दीपक घुगे आदींच्या पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीचा ठाणे शहरातील कळवा बाळकूम, कशेळी, मानकोली आणि भिंवडी परिसरातील सीसीटीव्हींचीही तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाहीद आरीफ हुसेन याला या प्रकरणात अवघ्या ४८ तासांमध्ये अटक केली. त्याने या चोरीची कबूली दिली असून त्याच्याकडून चोरीतील एक लाख ७५ हजारांची वॉल्सवेगन पोलो कंपनीची मोटारकार जप्त केली आहे. सोनसाखळीची जबरी चोरी करणाराही जेरबंद-दरम्यान, कळवा बिट मार्शल ४ चे पोलिस हवालदार सुनिल कोळेकर आणि पोलिस नाईक निलेश थोरात कळव्यातील न्यू शिवाजीनगर मार्केटमध्ये २४ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी गस्त घालीत होते. त्याचवेळी एक व्यक्ती त्यांना मार्केटमधील महिलेशी झटापट करून पळून जाताना त्यांना आढळला. चौकशीत आपल्या गळयातील सोनसाखळी जबरीने चोरी करुन चोरटा पळाल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली.
ही माहिती मिळताच या पोलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून मुस्तफा शेख या चोरटयाला रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक तोळे वजनाची तुटलेली सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली. त्यानेही या जबरी चोरीची कबूली दिली. जबरी चोरीनंतर अवघ्या तासाभरातच सोनसाखळी परत मिळाल्याने या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत.