उल्हासनगर : ठाणे, मुंबई उपनगरे, मुंबई शहर व रायगड जिल्ह्यातील पनवेल व कर्जत तालुक्यातून हद्दपार केलेल्या रहेमान अली शेख व यश उर्फ गोलू विशाल जजवंशी यांना हद्दपारीचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर मध्यवर्ती व उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड परिसरात राहणारा रहेमान सलीम शेख व कॅम्प नं-३ इमलीपाडा येथे राहणाऱ्या यश उर्फ गोलू विशाल जजवंशी यांना पोलीस परिमंडळ नं-४ च्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे व रायगड जिल्ह्यातील कर्जत व पनवेल तालुक्यातून हद्दपारीची कारवाई केली होती.
रहेमान शेख हा शहाड फाटक परिसरात असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सोमवारी पहाटे ४ वाजता अटक करून गुन्हा दाखल केला. तर यश जजवंशी हा इमलीपाड्यात हद्दपारीचे उल्लंघन केल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, सोमवारी रात्री सव्वा ११ वाजता हद्दपारीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. हद्दपारीचे कारवाई केलेले बहुतांश गुंड शहरात राहत असल्याची चर्चा शहरात रंगली असून पोलीस बघ्यांची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. हद्दपार केलेल्या गुंडावर हाणामारीसह अन्य गुन्हे दाखल झाल्यावरचे अनेक प्रकार शहरात यापूर्वी घडले आहेत.