ठाणे: पैशांच्या अमिषाने तरुणींकडून भिवंडी परिसरामध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेसह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली.
भिवंडीतील फंटोलेनगर मोती कारखान्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका खोलीत काही तरुणींकडून पैशांच्या अमिषाने शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फंटोलेनगरातील मोती कारखान्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमध्ये सापळा रचून एका बनावट गिऱ्हाईकाच्या मदतीने एका महिला दलालासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. यातील दोन्ही आरोपींविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. यातील पीडित महिलेला उल्हासनगरच्या सुरक्षागृहात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चौधरी यांनी दिली.