ठाणे : ठाण्यात आठ लाख १७ हजार ५०० रुपयांच्या अमली पदार्थांच्या (मेथएम्फाटामाइन) गोळ्यांची तस्करी करणाऱ्या अनिल चननगडण (४७, रा. कशेळी, भिवंडी, ठाणे) आणि उझ्झल कुनदू (रा. हडपसर, पुणे) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून मेथएम्फाटामाइनच्या ५४५ गोळ्या जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील खारेगाव टोलनाक्यापासून मुंब्य्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळवा ठाणे रोडवर एक व्यक्ती अमली पदार्थांच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे १२ मार्च रोजी दुपारी २.४० वाजेच्या सुमारास खारेगाव टोलनाक्यापासून जवळच असलेल्या गुलाबशेठ यांच्या प्लॉटच्या शेजारी अनिल याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड आणि उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आदींच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल याला १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश ठाणे न्यायालयाने दिला आहे. चौकशीदरम्यान त्याने या अमली पदार्थांच्या गोळ्या उझ्झल कुलदू याच्याकडून आणल्याचे उघड झाले. त्याआधारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांच्या पथकाने पुणे पोलिसांच्या मदतीने कुनदू याला १३ मार्च रोजी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव हे करीत आहेत.