ठाणे : ठाण्यातील एका वकिलाच्या मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या सागर यादव (२१) आणि हेमंत ठाणवी (२१, रा. दोघेही अशोकनगर, भिवंडी) या दोघांना ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख दहा हजारांचे १८ मोबाइल हस्तगत केले आहेत.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळून २२ जुलै रोजी दुपारी ठाण्यातील एक वकील पायी जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या सागरसह दोघांनी त्यांच्या हातातील २४ हजारांचा मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांच्या पथकाने भिवंडीतून सागर आणि हेमंत या दोघांना २३ जुलै रोजी अटक केली. त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दोन, नौपाडा भागातील तीन तर राबोडीतील एक असे सहा मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १६ मोबाइल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.