ठाणे: मोबाइल आणि सोनसाखळी जबरी चोरी करणाऱ्या सलमान अन्सारी (२९, रा. कारीवली रोड, भिवंडी) आणि मोहम्मद फैजान ऊर्फ बन्ना शहा (२०, रा. गुलजार नगर, भिवंडी) या दोघांना अलीकडेच अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. त्यांच्याकडून सात मोबाइल आणि एक मोटारसायकल असा दोन लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन हात नाका परिसरातून रोहन रोकडे (२८, रा. चाणक्यनगर, कल्याण) यांचा १३ हजारांचा एक मोबाईल मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी चोरुन नेला होता. १४ जून २०२१ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे आणि उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने सलमान याला १४ जून रोजी ताब्यात घेतले. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे जबरी चोरीतील सोन्याचे दागिने विकत घेणारा त्याचा साथीदार मोहम्मद फैजान यालाही नौपाडा पोलिसांनी १७ जून रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी मोटारसायकल आणि जबरी चोरीतील सात मोबाईल हस्तगत करण्यात आले. या दोघांनी नौपाडा,कापूरबावडी, नारपोली आणि भिवंडी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोबाइलची चोरी केली आहे.
* अन्य एका प्रकरणात कुर्ला येथून सलमान नौशाद शेख आणि दिलशाद नियाज खान या दोघांना कुर्ला, मुंबई येथून नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एका लॅपटॉपसह दहा मोबाईल असा ५८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
............