ठाणे : मोबाइल फोन टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या जितेंद्र पांडे (३३, रा. अंबिवली, कल्याण) आणि हर्षद बजागे (२४, रा. अंबिवली, कल्याण) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून ४७ हजार ५०० रुपयांच्या १२ बॅटऱ्या हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथील नरेश पाटील यांच्या मोकळ्या जागेत एका खासगी कंपनीच्या मोबाइल टॉवरला लावलेल्या ४८ वोल्टची बॅटरी बँक, त्यामध्ये २४ बॅटरी सेल आणि २३ कॉपर पट्टी असा सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्यांची चोरी ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान झाली होती. या प्रकरणी सुरक्षा अधिकारी संकेत हिर्लेकर यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात १२ ऑक्टोबर २०२० रोजी चोरीची तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने १३ मार्च २०२१ रोजी पांडे आणि बजागे या दोघांना अटक केली. त्यांना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून १२ बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. अशाच प्रकारे बॅटऱ्या चोरण्यात ही टोळी पटाईत असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या चोऱ्या कुठे केल्या आहेत, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.