मीरारोड - बॅनर विरुद्ध सातत्याने तक्रारी करून कायदेशीर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या नावे शिवसेनेचा बनावट बॅनर लावल्या प्रकरणी अखेर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांना तसेच एका रिक्षा चालकास पकडले आहे. त्यांना नयानगर पोलिसांच्या हवाली केले असून या मागच्या मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक करण्याची मागणी होत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता हे बेकायदा बॅनर विरोधात गेल्या अनेक वर्षां पासून तक्रारी करत आहेत . परंतु ९ फेब्रुवारी रोजी मीरारोडच्या पोलीस उपायुक्त कार्यालया जवळ आणि पय्याडे हॉटेल लगतच्या मार्गावर कृष्णा गुप्ता ह्यांचे छायाचित्रासह नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे शिवसेनेचा उल्लेख असलेले बॅनर लागले होते .
त्यावर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य यांची छायाचित्रे देखील होती . भाजपा कार्यकर्ते संजय साळवी व एस पी मौर्या यांच्या तक्रारी व एका नेत्याच्या मागणी वरून पालिकेच्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी १० रोजी नया नगर व मीरारोड पोलीस ठाण्यात जाहिरातदार व अनोळखी विरुद्ध फिर्याद दिली . पोलिसांनी लागलीच गुन्हे दाखल केले .
ह्या प्रकाराने खळबळ उडाली गुप्ता यांनी पोलिस व पालिके कडे तक्रार अर्ज करून हे आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचे षडयंत्र असून आपल्या तक्रारी नंतर माजी आमदार नरेंद्र मेहता तसेच माजी महापौर डिम्पल मेहता व उपमहापौर हसमुख गेहलोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता याची आठवण करून दिली .
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सदर प्रकरणी कारवाईची मागणी केली . सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवक्ते शैलेश पांडे , नगरसेविका स्नेहा पांडे यांनी थेट पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना भेटून तक्रार केली . ह्या मागे भाजपाच्या स्थानिक नेता व त्याच्या समर्थकांनी षडयंत्र रचल्याचा आरोप केला. आरोपीना अटक करण्याची मागणी केली .
गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ . महेश पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरु केला . तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वेगाने तपास करत बुधवारी रात्री गुन्हे शाखेने भाईंदरच्या नवघर गावात राहणारा विशाल पाटील व शेरा ठाकूर ह्या भाजपा कार्यकर्त्यांना पकडले . हे दोघेही मेहता यांचे कट्टर समर्थक मानले जातात .
पोलिसांनी भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांना अटक केल्या नंतर बनावट बॅनर मागे भाजपा कार्यकर्ते यांचे संगनमत असल्याचे समोर आले आहे . अटक तिघाही आरोपीना नया नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . ह्यात आणखी काही आरोपी असून पोलीस मास्टरमाईंडला कधी अटक करणार असा सवाल जागरूक नागरिक आणि शिवसेनेने चालवला आहे . दरम्यान नया नगर पोलीस आणि गुन्हे शाखा ह्या प्रकरणी सविस्तर माहिती देण्यास कमालीची गोपनीयता बाळगत आहेत .