ठाणे : जिल्ह्यातील तंत्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे (जीपीटी) या पॉलिटेक्नीक कॉलेजच्या रसायन अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान या दोन शाखांना राष्ट्रीय मानांकन मंडळ (एनबीए) या संस्थेने तीन वर्षासाठी राष्ट्रीय मानांकन घाेषीत केले आहे. राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी राज्यातील मुंबई तंत्रशिक्षण मंडळाअंतर्गत मुंबई विभागातील ठाणे शासकीय तंत्रनिकेत ही संस्था पहिली शासकीय पदविका संस्था ठरली आहे.
राष्ट्रीय मानांकन मंडळाच्या उच्चपदस्थ समितीने या पॉलिटेक्नीकला ९ ते ११ डिसेंबर या कालावधीमध्ये रसायन अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, ग्रंथालय, प्रशिक्षण व आस्थापना विभाग, कर्मशाळा विभाग, प्रथम वर्ष विभाग, आस्थापना आदी शाखांसह विभागांना भेट देऊन या राष्ट्रीय मानांकनाची घोषणा केली आहे. या विभागातील अध्ययन, प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबद्दल आढावा व परीक्षण केल्यानंतर हे मानांकन घोषीत करण्यात आले आहे.
या पॉलिटेक्नीकला मानांकन प्राप्त करून देण्यासाठी संस्थेचे तत्कालीन प्राचार्य डॉ. एन. एन म्हाला यांचे परिश्रम व मार्गदर्शन लाभले. तत्कालीन एनबीए संस्था समन्वयक व विद्यमान प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन, प्र. विभागप्रमुख पी. एस. घोडे, डी. पी. सपकाळ, एनबीए विभाग समन्वयक एस. एम. वसाके, व्ही. ए. खांडेकर, संस्थास्तरावरील समिती के. बी. साळुंखे, एस. ए. जानराव, डॉ. व्ही. पी. राठोड. पी. एस. चव्हाण, जे. डी. नाईक, प्राजक्ता महाजन, कर्मशाळा अधिकारी एन. एम अंबाडेकर, संस्था शैक्षणिक समन्वयक डॉ. एस. डी. धोबे, डॉ. एस. एस. मोतलिंग, ग्रंथालय प्रभारी व्ही. ए. चाटे, प्रथम वर्षे समन्वयक डॉ. एम. ए. सागर, कार्यालय अधीक्षक एस. एस. चव्हाण व संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केल्याचा दावा या पॉलिटेक्नीककडून केला जात आहे.