ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांनी शनिवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे.ओवळा नाका येथील ‘सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग’ याठिकाणी काही मुलींकडून पैशाच्या अमिषाने सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून सागर रेसिडेन्सी लॉजिंग अँड बोर्डिंग या हॉटेलमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवून दोन पुरुष दलालांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एका पिडित तरुणीची सुटकाही केली आहे.
या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७० (२), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पिडित तरुणीला मानपाडा येथील एका सामाजिक संस्थेमध्ये सुरक्षितरित्या ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.