ठाणे : कापूरबावडी भागात मोबाइल, रोकडची चोरी करणाऱ्या परवेझ शहा (रा. मनीषानगर) आणि महंमद अली (रा. उथळसर) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एक रिक्षा आणि रोकड, असा एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परवेझ आणि अली यांनी कापूरबावडी भागातील रहिवाशाला मारहाण करून त्याच्याकडून जबरीने मोबाइल चोरला होता. तसेच मारहाणीनंतर जबरीने मोबाइलद्वारे त्याच्याकडून १० हजारांची रोकड २८ फेब्रुवारी २०२१ ला लुबाडली होती. त्यानंतर ६ मार्चला याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली होती. याच तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. आव्हाड यांच्या पथकाने परवेझ आणि अली यांना अटक केली. या चोरीसाठी त्यांनी वापरलेल्या रिक्षासह सात हजारांची रोकड आणि मोबाइलही त्यांच्याकडून हस्तगत केल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.