लोकमत न्यूज नेटवर्क, मुरबाड : तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तालुक्यातील वैशाखरे प्रधानपाडा येथील दोन वर्षांच्या बालकाला रात्री सर्पदंश झाल्याचे पालकांना समजले. त्यांनी तो साप सोबत घेऊन बालकाला टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, रात्रीच्या वेळी तेथील गेट बंद असल्याने गेट उघडायला १५ ते २० मिनिटे लागली. त्यानंतर डॉक्टरांनी त्या सापाचे निरीक्षण करण्यास २० मिनिटे लावली. तो साप बिनविषारी आहे, असे सांगितले. बालकाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांनी त्याला उल्हासनगर येथे हलविले. तेथे जाताना धोकादायक रस्त्यामुळे बराच अवधी निघून गेला. त्या डाॅक्टरांनी कळवा येथे हलविले. मात्र रस्त्यात बालकाने प्राण सोडला.
दुसऱ्या घटनेत जांभुर्डे येथील रेश्मा भोईर ही गर्भवती प्रसूतीसाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात आली होती. तिची प्रसूती नैसर्गिकरीत्या झाली असताना, बाळाची तब्येत बिघडली. परंतु, मुरबाड रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ नसल्याने त्याला उपचारासाठी उल्हासनगरला हलविण्यात आले. वेळीच उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. आरोग्य व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा बळी गेल्याची तक्रार गुरुनाथ शेलवले यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
मुरबाड ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ मिळाले, तर त्यांच्या सल्ल्यानुसार बालकांवर प्राथमिक उपचार करता येतील. - डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मुरबाड.