उल्हासनगर : नेवाळी डावलपाडा येथे बुधवारी खोदलेल्या खड्ड्यात दोन मुलांचा पडून बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी संतप्त नागरिकांनी रस्तारोखो आंदोलन करून कारवाईची मागणी केल्यावर, हिललाईन पोलिसांनी कामाचा ठेकेदार किशोर मसुरकर व साईड व्यवस्थापक संतोष पिलगर यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर शेजारील नेवाळीगाव डावलपाडा या परिसरात एमआयडीसीने जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्यात बुधवारी दुपारी ४ वाजता ८ व ६ वर्षाचे सुरज राजभर व सनी यादव यांचा पडून मृत्यू झाला. पाण्याने भरलेल्या खड्ड्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून ठेकेदाराने बॅरिकेट्स लावने गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने, दोन चिमुकल्याचा मृत्यू झाला. याप्रकारने मृत शाळेकरी मुलांचे नातेवाईक व नागरिक संतप्त होऊन शेजारी मुख्य रस्तावर रस्तारोखो आंदोलन करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुलांवर ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिललाईन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून गुरवारी उशिरा एस एम सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली ठाणे या कंपनीचे मालक किशोर मसुरकर व साईड व्यवस्थापक संतोष पिलगर यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. तसेच खोदलेला खड्डा त्वरित बुजविण्याचे आदेश पोलिसांनी कंपनीला दिला. या घटनेने नेवाळी डावलपाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध व्यक्त होत आहे.