अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत. डुप्लिकेट रेशन कार्ड आणि ऑनलाइन नोंदणी यासाठी प्रत्येक कार्डामागे ५०० रुपयांची लाच घेताना या दोन क्लार्कना ठाणे अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या.
अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. कुठल्याही लहानमोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. जावसई भागात राहणारे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू सोमा यांनी त्यांच्या भागातील दोन जणांचे फाटलेले रेशन कार्ड नव्याने तयार करण्यासाठी, तर एक रेशन कार्ड ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी दिले होते. या प्रत्येक कार्डासाठी ५०० रुपये याप्रमाणे १५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. खिडकी क्रमांक २ वरील क्लार्क प्रताप ब्रह्मनाद आणि खिडकी क्रमांक ३ वरील क्लार्क सुनीता हिंदळे यांनी ही लाच मागितली होती. त्यामुळे राजू सोमा यांनी याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी सापळा रचून अँटी करप्शन विभागाने या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
-------------------------------------