अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शूटिंग रेंजचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले; मात्र या एकाच कामासाठी तिथे चक्क दोन कोनशिला लावण्यात आल्या आहेत. हा प्रकार संभ्रमातून झाला आहे, मानापमानाच्या नाट्यातून की, सेनेचीच सत्ता असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतर्गत राजकारणातून हे स्पष्ट झाले नसले तरी पालिका वर्तुळात हा खमंग चर्चेचा विषय ठरला आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या शूटिंग रेंजचे उद्घाटन मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्र मासाठी पालिकेच्या वतीने स्टीलची कोनशिला तयार करण्यात आली होती. त्या कोनशिलेचे फिटिंग सुरू असतानाच आणखी एक कोनशिला शूटिंग रेंजमध्ये दाखल झाली. ती नेमकी कुठून आली, असा प्रश्न सर्वांनाच पडला. याबाबत, चौकशी केली असता, शिवसेना नेत्यांच्या पुढाकारानेच नवीन कोनशिला पाठवण्यात आल्याची माहिती उघड झाली. नवी कोनशिला थेट ठाण्यावरून आल्याने ती लावणे स्थानिक नेत्यांसाठी एक प्रकारे बंधनकारकच होते. स्थानिक शिवसेनेमध्ये याबाबत कुजबूज असली, तरी स्पष्ट बोलण्यास कुणीही धजावत नाही. अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोनशिलेवरील मजकूर आणि ठाण्याहून आलेल्या नवीन कोनशिलेवरील मजकुरात तफावत आहे. नव्या कोनशिलेवर आमदार आणि खासदार निधीचा उल्लेख असल्याने तिच कोनशिला लावण्यासाठी हट्ट होता. मात्र प्रत्यक्षात शूटिंग रेंजच्या एकूण खर्चापैकी १० टक्के रक्कमदेखील आमदार किंवा खासदार निधीतून आलेली नाही. असे असतानाही नव्या कोनशिलेतून संपूर्ण शूटिंग रेंजचे श्रेय लाटण्याचाच प्रयत्न केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
पालिकेच्या कोनशिलेवर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे पूर्ण सन्मानाने लिहिलेली असतानादेखील नवीन कोनशिला आल्याने हा प्रकार हा प्रकार मानापमानातून घडला असावा, हे उघड झाले आहे. पालिकेच्या कोनशिलेमध्ये बहुतांश आमदार, खासदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिक नगरसेवक, पालिकेतील नेते, अधिकारी आणि प्रशिक्षकांच्याही नावांचा उल्लेख आहे. मात्र, शूटिंग रेंजचे काम खा. श्रीकांत शिंदे आणि आ. बालाजी किणीकर यांच्या निधीतून झाल्याचा उल्लेख या कोनशिलेमध्ये नाही. ठाण्याहून आलेल्या कोनशिलेवर हा उल्लेख ठळकपणे करण्यात आला आहे. इतर लोकप्रतिनिधी, पालिकेतील स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या नावांना या कोनशिलेमध्ये कात्री लावण्यात आली आहे. खासदार आणि आमदारांच्या निधीचा उल्लेख पालिकेच्या कोनशिलेत नसल्यामुळेच हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.अंबरनाथ पालिकेत सेनेची सत्ता आहे. स्वपक्षाचीच सत्ता असताना शूटिंग रेंजचे काम खा. श्रीकांत शिंदे आणि आ. बालाजी किणीकर यांच्या निधीतून झाल्याचा उल्लेख न करण्याचे कारण काय, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. खा. शिंदे आणि आ. किणीकरांना डावलण्यामागे अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे की, अनवधानाने त्यांचा उल्लेख राहून गेला, यावरही चर्चा रंगली आहे.आदित्य ठाकरेंची झाली पंचाईतशूटिंग रेंजचे उद्घाटन करताना नेमक्या कोणत्या कोनशिलेचे अनावरण करावे, अशी वेगळीच पंचाईत आदित्य ठाकरे यांच्यासमोर होती. त्यांनी नाइलाजास्तव दोन्ही कोनशिलांचे अनावरण करून त्या ठिकाणी फोटोसेशनदेखील केले. आता उद्घाटनानंतर शूटिंग रेंजमध्ये दोन्ही कोनशिला राहतील की, त्यातील एक कोनशिला निघेल, याबाबत प्रतिक्रि या देण्यास कोणताही अधिकारी तयार नाही. शूटिंग रेंजच्या उद्घाटनाची जबाबदारी पालिकेची असली, तरी खर्चाचा अंदाज घेऊन कार्यक्र माची जबाबदारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली होती.