कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात रुग्णांना बेड मिळत नाहीत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे काहींचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. मृत्यूनंतर या रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या मृताच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे; कारण कल्याणच्या दोन स्मशानभूमींतील शवदाहिन्या बंद आहेत. त्यामुळे मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर शवदाहिनीत अंत्यसंस्कार केला जातो. महापालिका हद्दीत सहा स्मशानभूमींत शवदाहिनीची व्यवस्था आहे. मात्र, सहापैकी कल्याणमधील मुरबाड रोडवरील आणि लाल चौकी येथील दोन शवदाहिन्या बंद पडल्या आहेत. त्या बंद असल्याने नातेवाइकांना पारंपरिक पद्धतीने लाकडावर मृतदेहाचे दहन करावे लागत आहे. लाकडावर दहन करताना एका मृतदेहाला दहन करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. त्यामुळे अन्य मृतदेहांच्या अंत्यविधीकरीता विलंब होत आहे. विशेषत: कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी विलंब होत आहे. कोरोना रुग्णांचा मृतदेह हा तातडीने अंत्यसंस्कारांसाठी नेला पाहिजे. त्यासाठी विलंब होता कामा नये. काही ठिकाणी दिवसाला सात ते आठ कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीवरही ताण येत आहे.
-प्लास्टिकमुळे शवदाहिन्या होत आहेत नादुरुस्त
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी देवपनपल्ली यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महापालिकेच्या सहा स्मशानभूमींत सहा शवदाहिन्यांची सोय आहे. त्यांपैकी लाल चौकी व मुरबाड रोडवरील स्मशानभूमीतील दोन शवदाहिन्या गुरुवारपासून बंद आहेत. एका शवदाहिनीत एक मृतदेह जाळल्यावर किमान ४५ मिनिटांनंतर दुसरा मृतदेह जाळला गेला पाहिजे. मशीनला ४५ मिनिटांचा गॅप मिळत नाही. तसेच कोविड आणि कोविडसंशयित मृतांचे मृतदेह हे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले असतात. प्लास्टिकमुळे शवदाहिनी नादुरुस्त होते. या दोन्ही शवदाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. शवदाहिनी बंद असल्यास पारंपरिक पद्धतीने लाकडावर कोविड आणि संशयित मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यास मुभा आहे. अंत्यविधी मोफत केला जात आहे. त्यासाठी महापालिका शुल्क आकारत नाही. त्याचबरोबर सहा स्मशानभूमींत ३७ स्टँड आहेत. या स्टँडवर लाकडाद्वारे मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात.
------------------------