ठाणे : ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ने १.३८ कोटींच्या जुन्या नोटा सोमवारी रात्री हस्तगत केल्यानंतर २४ तासांत पुन्हा ठाणे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाला मंगळवारी रात्री डोंबिवली मानपाडा येथे सुमारे २ कोटींच्या भारतीय चलनातून रद्द झालेल्या जुन्या नोटा हस्तगत करण्यात यश आले आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमधील एक मेडिकल दुकानदार असून, दुसरा माजी कामगार नेता आहे.डोंबिवली मानपाडा येथील पलावा सिटी परिसरात काही जण आलिशान गाडीतून भारतीय चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री सापळा रचून अजित माधवराव सुर्वे (५७, रा. डोंबिवली पूर्व), रवींद्र भास्कर चौधरी (३४, रा. लालचौकी कल्याण), पद्मसिंग प्रेमसिंग बिष्ट (२७, रा. करागेगाव,नेरूळ, नवी मुंबई) आणि प्रकाश उर्फ सुनील कौतिक पाटील (३४, रा. आशाळेपाडा, उल्हासनगर) या चौघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या गाडीची तपासणी केल्यावर त्या गाडीत भारतीय चलनातून बाद झालेल्या एक हजाराच्या १९ हजार ६९१, तर पाचशेच्या २६८ नोटा एका नायलॉन पिशवीतून पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यांची किंमत १ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये आहे. या नोटांसह ज्या गाडीतून ते नोटा घेऊन जात होते, ती गाडीही जप्त केली असून त्यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात बेकायदेशीररीत्या नोटा बाळगून त्यांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, बुधवारी सकाळी त्यांना अटक केली.- अटक आरोपींमधील अजित हा एका बंद झालेल्या कंपनीचा माजी कामगार नेता आहे. रवींद्र हा मेडिकल दुकानदार असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, पद्मसिंग हा चालक आहे. त्यांनी या नोटा कोठून आणल्या, ते कोणाला देणार होते, याचा शोध घेण्यासाठी न्यायालयाकडे १० दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेवारे यांनी सांगितले.
ठाण्यात २ कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत, चौघांना अटक, २४ तासांतील पोलिसांची दुसरी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:01 AM