- शाम धुमाळ
कसारा : ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील सर्वात मोठी कारवाई शहापूर वन विभागाच्या सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी खर्डी वन विभागाच्या मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलात केली आहे. तब्बल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सागवान जातीच्या लाकडाची चोरटी तोड पकडली असून २०० हून अधिक कर्मचारी या कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते.
शहापूर तालुक्यातील खर्डी वन विभागातून सागवान जातीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तू बनविण्याऱ्या कारखानदारांना पुरवठा केला जात असल्याची माहिती वन विभागाचे वन अधिकारी प्रशांत देशमुख यांना मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार सागवान जातीचा लाकूड मोठ्या प्रमाणात असल्याने शहापूर तालुक्यातील कसारा, विहिगाव, वाशाला सह अन्य सहा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक, वन मजूर अशी २०० जणांची टीम तैनात करण्यात आली होती. मोडकसागर धरण क्षेत्रातील जंगलात सर्च ऑपरेशन करीत जंगलात मोठ्या प्रमाणात लाकडापासून वस्तू बनविण्यासाठी लागणारे सागवान जातीच्या लाकडांच्या फळ्या, चौपट ३० ते ३५ फूट लांब लाकडी खांब असे एकूण २ कोटी पेक्षा जास्त किमतीचा सागवान जातीचा लाकूड जप्त करण्यात आला. सर्व किमती लाकूड खर्डी वनविभाग च्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी व्ही, टी. घुले, आर, एच, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी प्रशान्त देशमुख पुढील तपास करीत आहेत.
दबंगगिरीचा प्रयत्न
दरम्यान, कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईवेळी काहीजणांकडून दबंग गिरीचा प्रयत्न करण्यात आला.
रेतीचोरांचे धाबे दणाणले
दरम्यान, वनविभाग खर्डीचे अधिकारी देशमुख यांनी केलेल्या कारवाईमुळे वैतरणा धरणात रेती उपसा करणाऱ्या रेती चोरांचे धाबे दणाणले आहेत.